Ad will apear here
Next
‘फुलराणी’ आणि ‘पैठणी’ कवितांचे अभिवाचन : मधुराणी प्रभुलकर


निसर्गाचं अत्यंत सुंदर वर्णन आपल्या कवितांमधून करणारे कवी म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे ऊर्फ बालकवी. अत्यंत प्रसन्न आणि टवटवीत लेखन करणाऱ्या लेखिका-कवयित्री म्हणजे शांता शेळके. बालकवींची ‘फुलराणी’ ही कविता आणि शांताबाईंची ‘पैठणी’ ही कविता म्हणजे एक वेगळीच अनुभूत देणाऱ्या साहित्यकृती. मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या विशेष उपक्रमाचा एक भाग म्हणून या कविता आपल्यापुढे सादर केल्या आहेत कवितांवर प्रेम करणारी अन् ‘कवितेचं पान’ ही सुंदर वेबसीरिज चालवणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिनं...
.......
त्र्यंबक बापूजी ठोंबरे ऊर्फ बालकवी
हिरवे हिरवेगार गालिचे – हरित तृणांच्या मखमालीचे;
त्या सुंदर मखमालीवरती – फुलराणी ही खेळत होती.

गोड निळ्या वातावरणात – अव्याज-मने होती डोलत;
प्रणयचंचला त्या भ्रूलीला – अवगत नव्हत्या कुमारिकेला,
आईच्या मांडीवर बसुनी – झोके घ्यावे, गावी गाणी;
याहुनि ठावे काय तियेला – साध्या भोळ्या फुलराणीला?
पुरा विनोदी संध्यावात – डोलडोलवी हिरवे शेत;
तोच एकदा हासत आला – चुंबून म्हणे फुलराणीला-
“छानी माझी सोनुकली ती – कुणाकडे ग पाहत होती?
कोण बरे त्या संध्येतून – हळुच पाहते डोकावून?
तो रविकर का गोजिरवाणा – आवडला अमुच्या राणींना?”
लाजलाजली या वचनांनी – साधी भोळी ती फुलराणी!

आन्दोली संध्येच्या बसुनी – झोके झोके घेते रजनी;
त्या रजनीचे नेत्र विलोल – नभी चमकती ते ग्रहगोल!
जादूटोणा त्यांनी केला – चैन पडेना फुलराणीला;
निजली शेते, निजले रान, – निजले प्राणी थोर लहान.
अजून जागी फुलराणि ही – आज कशी ताळ्यावर नाही ?
लागेना डोळ्याशी डोळा – काय जाहले फुलराणीला?

या कुंजातुन त्या कुंजातुन – इवल्याश्या या दिवट्या लावुन,
मध्यरात्रिच्या निवान्त समयी – खेळ खेळते वनदेवी ही.
त्या देवीला ओव्या सुंदर – निर्झर गातो; त्या तालावर –
झुलुनि राहिले सगळे रान – स्वप्नसंगमी दंग होउन!
प्रणयचिंतनी विलीनवृत्ति – कुमारिका ही डोलत होती;
डुलता डुलता गुंग होउनी – स्वप्ने पाही मग फुलराणी –

“कुणी कुणाला आकाशात – प्रणयगायने होते गात;
हळुच मागुनी आले कोण – कुणी कुणा दे चुंबनदान !”
प्रणयखेळ हे पाहुनि चित्ति – विरहार्ता फुलराणी होती;
तो व्योमीच्या प्रेमदेवता – वाऱ्यावरती फिरता फिरता –
हळूच आल्या उतरुन खाली – फुलराणीसह करण्या केली.
परस्परांना खुणवुनि नयनी – त्या वदल्या ही अमुची राणी!

स्वर्गभूमीचा जुळ्वित हात – नाचनाचतो प्रभातवात;
खेळुनि दमल्या त्या ग्रहमाला – हळुहळु लागति लपावयाला
आकाशीची गंभीर शान्ती – मंदमंद ये अवनीवरती;
विरू लागले संशयजाल, – संपत ये विरहाचा काल.
शुभ्र धुक्याचे वस्त्र लेवुनि – हर्षनिर्भरा नटली अवनी;
स्वप्नसंगमी रंगत होती – तरीहि अजुनी फुलराणी ती!

तेजोमय नव मंडप केला, – लख्ख पांढरा दहा दिशाला,
जिकडे तिकडे उधळित मोती – दिव्य वर्हाडी गगनी येती;
लाल सुवर्णी झगे घालुनी – हासत हासत आले कोणी;
कुणी बांधिला गुलाबि फेटा – झकमणारा सुंदर मोठा!
आकाशी चंडोल चालला – हा वाङनिश्चय करावयाला;
हे थाटाचे लग्न कुणाचे – साध्या भोळ्या फुलराणीचे!

गाउ लागले मंगलपाठ – सृष्टीचे गाणारे भाट,
वाजवि सनई मारुतराणा – कोकिळ घे तानावर ताना!
नाचु लागले भारद्वाज, – वाजविती निर्झर पखवाज,
नवरदेव सोनेरी रविकर – नवरी ही फुलराणी सुंदर !
लग्न लागते! सावध सारे! सावध पक्षी ! सावध वारे !
दवमय हा अंतपट फिटला – भेटे रविकर फुलराणीला !

वधूवरांना दिव्य रवांनी, – कुणी गाइली मंगल गाणी;
त्यात कुणीसे गुंफित होते – परस्परांचे प्रेम ! अहा ते!
आणिक तेथिल वनदेवीही – दिव्य आपुल्या उच्छवासाही
लिहीत होत्या वातावरणी – फुलराणीची गोड कहाणी!
गुंतत गुंतत कवि त्या ठायी – स्फुर्तीसह विहराया जाई;
त्याने तर अभिषेकच केला – नवगीतांनी फुलराणीला!
- बालकवी

(बालकवींच्या निवडक कविता अन् त्यांवरचे ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. बालकवींचं साहित्य ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी https://goo.gl/FK6pzC येथे क्लिक करा.)
..............
शांता शेळके

पैठणी

फडताळात एक गाठोडे आहे
त्याच्या तळाशी अगदी खाली
जिथे आहेत जुने कपडे
कुंच्या टोपडी शेले शाली
त्यातच आहे घडी करुन
जपून ठेवलेली एक पैठणी
नारळी पदर जरी चौकडी
रंग तिचा सुंदर धानी

माझी आजी लग्नामध्ये
हीच पैठणी नेसली होती
पडली होती साऱ्यांच्या पाया
हाच पदर धरून हाती
पैठणीच्या अवतीभवती
दरवळणारा सूक्ष्म वास
ओळखीची... अनोळखीची...
जाणीव गूढ़ आहे त्यास

धूर कापूर उदबत्यांतून
जळत गेले किती श्रावण
पैठणीने जपले
एक तन... एक मन...
खस हिन्याची माखली बोटे
पैठणीला केव्हा पुसली
शेवंतीची चमेलीची
आरास पदराआडून हसली


वर्षामागुन वर्षे गेली
संसाराचा सराव झाला
नवा कोरा कडक पोत
एक मऊपणा ल्याला

पैठणीच्या घडीघडीतून
अवघे आयुष्य उलगडत गेले
सौभाग्य मरण आले
आजीचे माझ्या सोने झाले

कधीतरी ही पैठणी
मी धरते ऊरी कवळुन
मऊ रेशमी स्पर्शामध्ये
आजी भेटते मला जवळुन
मधली वर्षे गळुन पडतात
कालपटाचा जुळतो धागा
पैठणीच्या चौकड्यानो
आजीला माझ्या कुशल सांगा
- शांता शेळके

(शांता शेळके यांच्या निवडक कविता अन् त्यांवरचे ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. शांता शेळके यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी https://goo.gl/64mt1C येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZOYBL
 खूपच छान उपक्रम!! बालकवींंचे शब्द आणि मधुराणीचा गोड आवाज..... प्रसन्न अनुभव!!
Similar Posts
बालकवींची औदुंबर कविता : अभिवाचन - स्वाती महाळंक त्र्यंबक बापूजी ठोंबरे अर्थात बालकवी यांना निसर्गकवी असे म्हटले जाते. त्यांच्या बहुतांश रचना त्याची साक्ष देतात. अवघ्या आठ ओळींत आपल्यापुढे एक मनोहर निसर्गचित्र उभी करणारी आणि आपल्याला एका वेगळ्याच भावविश्वात घेऊन जाणारी कविता म्हणजे ‘औदुंबर.’ मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या विशेष उपक्रमाचा
निजलेल्या बालकवीस : अभिवाचन - अक्षय वाटवे बालकवी म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना झोपेतून उठविण्याच्या निमित्ताने त्यांचे गुणवर्णन करणारे गोविंदाग्रजांनी केलेले काव्य म्हणजे ‘निजलेल्या बालकवीस.’ ‘फारच थोड्या वेळात हे काव्य केलेले असल्यामुळे त्यात बालकवींचे यथार्थ गुणवर्णन आलेले नाही,’ असेही त्यांनी या गीताच्या प्रस्तावनेत म्हटले आहे. मंगेश
कविवर्य कुसुमाग्रजांची ‘विशाखा’ ‘जीवनलहरी’ आणि ‘जाईचा कुंज’ यांनंतरचा ‘विशाखा’ हा कुसुमाग्रजांचा तिसरा काव्यसंग्रह. औचित्य, संयम, विलक्षण जीवन, निसर्ग, राष्ट्र यावरील प्रेम यांतून कुसुमाग्रजांच्या कवितेचा प्रवाह खळखळत, वेगाने वाहत राहतो, याचा प्रत्यय ‘विशाखा’तील कवितांमधून पुन:पुन्हा येतो. आज, २७ फेब्रुवारीला कुसुमाग्रजांच्या जयंतीदिनी मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो
लाभले अम्हांस भाग्य... गझलकार सुरेश भट यांचे जे शब्द मराठीचे अभिमानगीत बनले, ती गझल आज पाहू या...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language